ऐंशीच्या दशकातील पुणे-नगर महामार्गाच्या अलिकडील मागास भाग म्हणजे सध्याचा विश्रांतवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, धानोरी, कलवड, बर्माशेल, संजयपार्क, लोहंगाव, नागपूरचाळ व येरवडा परिसर. हा भाग आता अतिशय विकसित दिसतो. मोठेमोठे मॉल, रहिवाशी इमारती, आय.टी कंपन्या, शोरूम, लोहंगाव विमानतळ, मोठी बाजारपेठ आणि राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे या भागात पहायला मिळते. मात्र आज कोणी आपल्याला सांगितले की ऐंशीच्या दशकात पुणे शहाराच्या या भागात सी.बी.एस.ई, आय. सी. एस. ई.सोडा पण मराठी माध्यामाची माध्यामीक शाळाही असित्वात नव्हती यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
त्यावेळी विश्रांतवाडी भागात दगड खाण व खडीमशीन होती. याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे मोठया कंपन्यांमध्ये कामासाठी आलेल्या सर्वसामान्य चाकरमाने/ नोकरदार विद्यानगर, टिंगरेनगर, धानोरी, नागपूरचाळ भागात रहायला येऊ लागले होते. येरवडयात फक्त सातवीपर्यंत शाळा होती. त्यामुळे मोलमजूरी करणाऱ्या आणि सर्वसामान्य नोकदारांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती. अशा मागास भागात कोणी शिक्षण संस्था काढणार तरी कशाला ? मात्र ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन आलेल्या या पंचक्रोशीचे रुपडे पालटविण्याची विधात्याचीच इच्छा असावी.
उत्तराखंडातील हृषिकेश येथील एका ट्रस्टवर कार्य करणाऱ्या वारकरी सांप्रदायातील एका व्यक्तीच्या मनात ट्रस्टच्या माध्यामातून वृद्धाश्रम, अनाथालय, सत्संगभवन सुरु करण्याऐवजी शाळा सुरु करावी. असे विचार आले. कारण ‘ज्ञानदान’ हेच खरे संताचे महत्त्वाचे कार्य आहे, अशी त्यांची धारणा होती.
त्यांच्या या ‘एका’ विचारामुळे टिंगरेनगर, धानोरी, विश्रांतवाडी परिसराचे चित्र बदलणारे होते याबद्दल मात्र कुणालाही कल्पना नसावी. ‘श्री विठ्ठलाश्रम हृषिकेश ट्रस्टचा शाळा सुरु करणास हिरवा कंदील होता. त्यावेळी कोथरुडसारख्या भागात शाळा सुरू करण्याऐवजी त्यांनी टिंगरेनगरसारख्या मागास भागात शाळा सुरु करण्याचे ठरविले, मात्र खरी कसोटी तर पुढे होती. कारण तो कालखंड होता 1978 चा. त्यावेळी नवीन मराठी माध्यमाच्या शाळांना परवानगी न देण्याचे महाराष्ट्र सरकारचे धोरण होते. तरीही ‘विशेष बाब’ म्हणून राज्य सरकाराने शाळेस परवानगी दिली. असे म्हणतात, माणसाने निर्माण केलेली प्रत्येक कलाकृती किंवा रचना दोनदा तयार होत असते. दुसऱ्यांदा तयार होते ती आपण सगळेजण आपल्या डोळयांनी पाहू शकतो मात्र पहील्यांदा ती कलाकृती कुठे तयार होत असेल तर ती आपल्या डोक्यात. टिंगरेनगर परिसरातील पहिली मराठी माध्यामाची शाळाही पहिल्यांदा ज्या व्यक्तीच्या सुपिक डोक्यात सुरु झाली ती व्यक्ती म्हणजे आपले हिमगिरी विद्यालयचे संस्थापक श्री सोपान भुकेले सर.
नवीन मराठी शाळांना मान्यता न देण्याचे सरकारचे धोरण असतानाही ट्रस्टचे संचालक श्री तेंडूलकर यांच्या माध्यमातून संबंधीत खात्याच्या सचिवांना शाळेस परवानगी मिळाल्यास टिंगरेनगर, विश्रांतवाडी भागातील मुला-मुलींना शिक्षणाची दारे खुली होतील हि बाब पटवून देण्यात आली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘विशेष बाब’ म्हणून शाळा सुरु करण्यास परवानी देण्यात आली.
मे महिन्यात शाळा सुरु करण्यास परवानगी मिळाली. 15 जूनला शाळा सुरु करायची होती, पण ना कुठे शाळेची इमारत होती ना विद्यार्थ्यांचा पत्ता होता. त्याचवेळी श्री सोपान भुकेले सरांनी महापालिका शाळेतील शिक्षक श्री सोपान शिंदे व श्री लोंढे यांच्याबरोबर चालत, प्रसंगी सायकलवरून, परिसरातील घरोघरी जाऊन विद्यार्थी शोध मोहीम सुरु केली.
टिंगरेनगर येथील बाळासाहेब टिंगरे यांनी त्यांची चाळ आणि मोकळी जागा भाडयाने देऊ केली होती. सध्याच्या रोड क्रमांक चौदा येथे ही जागा होती. 12 जून 1978 रोजी श्री बाळासाहेब टिंगरे, श्री कुंजीर, सौ. शांताबाई चौधरी, श्री भुकेले सर, श्री शिंदे सर, श्री जाधव सर, श्री सोपान शिंदे आणि श्री लोंढे गुरुजी यांनी भटकंती करुन मिळविलले नऊ विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेचे उद्घाटन झाले. हीच ती आपली ‘जुनी हिमगिरी’.
शाळेच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नऊ विद्यार्थ्यांनी भागणार नव्हते. त्यासाठी शाळेची पटसंख्या 60 असणे गरजेचे होते. वरील मंडळींच्या अथक प्रयत्नातून सप्टेंबर 1978 मध्ये हा अडथळाही दूर करण्यात आला आणि म्हणूनच आपल्यासारखे हजारो विद्यार्थी घडू शकले. 1981 साली शाळा अनुदानित झाली. कालांतराने शाळेची स्वत:ची इमारत उभी राहिली. हीच ती सध्याची ‘हिमगिरी विद्यालय’ ची इमारत. जिथे आपल्यापैकी बहुतेक विद्याथर्यांनी शिक्षण घेतले आहे आणि काहीजणांना इमारतीचे बांधकाम चालू असताना ‘श्रमदान’ करण्याची संधीही मिळाली होती.
एखादया वटवृक्षाचे रोपटे उगवते त्यावेळी भविष्यातील त्याच्या भव्यतेचा कुणालाही अंदाज नसतो. त्याचप्रमाणे ‘हिमगिरी’ विद्यालयाचा वटवृक्ष बहरला होता. नऊ विद्याथर्यांच्या साक्षीने 1978 झाली सुरु झालेल्या आपल्या शाळेची पटसंख्या 1995 च्या दरम्यान दोन हजारांवर गेली होती. कधीकाळी दरोदार फिरून शाळेच्या मान्यतेसाठी 60 विद्यार्थी मिळविले होते, आणि आता एक-एका वर्गात सत्तर- सत्तर विद्यार्थी होते. चार ज्यादा तुकडयांना मान्यता मिळूनही वर्गात जागाच शिल्लक नसल्याने नवीन विद्याथर्यांना प्रवेश देता येत नव्हता . या वृटवृक्षाच्या कुशीत समाजाच्या विविध स्तरातील विद्यार्थीरूपी अनेक पक्षी आले आणि ज्ञानानेच नव्हे तर संस्करांनीही समृद्ध झाले.
याच शाळेत आम्हाला ‘आईच्या’ मायेने आणि बापाच्या कडक शिस्तीने शिकविणारे अनेक शिक्षक भेटले. ज्या विद्याथर्यांनी तळहातावर पडणाऱ्या छड्याही प्रसादाप्रमाणे झेलल्या त्यांच्या जीवनात इथे मिळालेल्या ज्ञानाने आणि संस्कारांनी त्यांना एका भक्कम पायावर उभे केले. याच शाळेने अनेक अभियंते, डॉक्टर, व्यावसायिक, शिक्षक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, बहुराष्ट्रीय कंपन्यात चांगल्या पदांवर काम करणारे नोकरदार घडविले. छोट्या पातळीवर काम करणारेही अनेकजण आहेत मात्र त्यांच्यात दिसणारी सचोटी, प्रामाणिकता ही फक्त ‘हिमगिरी मुळेच आहे.आपल्या शाळेत वारकरी सांप्रदायाच्या विचारांमुळे संस्करांना अतिशय महत्त्व आहे. शिक्षणाबरोबर संस्कारही देणारी, अवघ्या पंचक्रोशीतील ‘हिमगिरी’ हि एकमेव शाळा आजमितीस अस्तित्वात आहे.
शाळेने रुजवलेल्या असंख्य संस्कारांचा एक भाग म्हणून शाळेशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी शाळेच्या सर्व बॅचेसच्या अनेक माजी विद्यार्थयांनी स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करून दूर गेलेले अनेक विद्यार्थी, निवृत्त शिक्षक, परदेशस्थ माजी विद्यार्थी, लग्न होऊन सासरी गेलेल्या अनेक भगिनी, आपल्या मुलांवर संस्कार होताना पाहणारे अनेक पालक तसेच शाळेशी या ना त्या कारणाने नाळ जोडली गेलेली अनेक माणसे अशा असंख्य लोकांना शाळेशी असलेले ऋणानुबंध जोपासता यावेत यासाठी माजी विद्यार्थांनी शाळा डिजिटल स्वरूपात उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हिमगिरी विद्यालयाची www.himgiriyans.in हि वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये शाळेशी निगडित अनेक आठवणी फोटोज आणि व्हिडीओजच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व प्रपंचात शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी, शाळेच्या शिक्षकांनी आणि शाळा प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सर्व कार्यभागास शाळेचे संस्थापक आदरणीय श्री सोपान भुकेले सरांनी परवानगी दिली आहे.
या सर्व प्रपंचाचा उद्देश एवढाच कि शाळेशी असलेले सर्वांचे ऋणानुबंध असेच अबाधित राहावेत. पुन्हा एकदा आम्ही हिमगिरी विद्यालय, शाळा प्रशासन, सर्व शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी आणि शाळेचे संस्थापक आदरणीय श्री सोपान भुकेले सर या सर्वांना कोटी-कोटी प्रणाम करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद !
जयहिंद
जय महाराष्ट्र!
आपण सारे हिमगिरीयन्स!
(टिप: सदर वेबसाईट ही विद्याथर्यांनी शाळेबद्दलचे ॠणाणुबंध जपण्यासाठी शाळेच्या संमतीने तयार केलेली आहे. या वेबसाईटचा उद्देश्य शाळेबद्दलच्या आठवणीनां उजाळा देणे हा आहे. या वेबसाईटचा उद्देश्य शाळा, शाळा-प्रशासन, शिक्षक व इतर कर्मचारी याबद्दल कोणतेही मत व्यक्त करणे हा नाही. आम्हाला शाळेच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार नाही. आम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करत नाही. या वेबसाईट मधील माहितीचा दुरुपयोग करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. )